Two workers died due to suffocation at industrial unit in Verna IDC : गोव्यातील वेर्णा येथील सिप्ला या औषध निर्मीती कंपनीत झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (25 जुलै) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघातानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे गोव्यातील वेर्णा औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीत युनिट-2 ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर दुरुस्ती करण्यासाठी लिफ्टच्या खड्यात उतरले होते. त्यावेळी गुदमरुन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पवार (24) हा सांगलीचा तर अक्षय पाटील (27) हा कोल्हापूर येथील होता. हे दोघे एनजे रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. तर तिसरा कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. दरम्यान वेर्णा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या तरतुदीनुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
न्याय मिळणार? आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी दोन कामगारांच्या मृत्यूचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सिप्ला कंपनीत गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू झाला ही घटना मोठी असून, मृत कामगार गोंयकार असो किंवा परप्रांतीय त्यांना न्याय मिळायला हवा. तसेच, कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप यावेळी सरदेसाई यांनी केला. दरम्यान याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंपनी कोणतीही असो याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सभागृहात सांगितले.