बेळगाव—belgavkar—belgaum : महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्हीप बजावण्यात आला आहे. भाजपच्या महानगर जिल्हा अध्यक्ष गीता सुतार यांनी व्हीप बजावल्याची माहिती मिळाली आहे महापौर व उपमहापौर निवडणुकीला पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे व पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याच उमेदवाराला मतदान करावयाचे, असे व्हीपमध्ये नमूद केले आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दरम्यान, महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून नियुक्त केलेले निरीक्षक व विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. पक्षाच्या महानगर जिल्हा अध्यक्ष गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आदी उपस्थित होते. बैठकीला भाजपचे 33 नगरसेवक तसेच 2 अपक्ष नगरसेवकही उपस्थित होते.
सत्ताधारी गटातील काही नगरसेवक तसेच सत्ताधारी गटासोबत असलेले अपक्ष नगरसेवक नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती; पण सर्वच नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्यामुळे ही चर्चा थांबली आहे. निरीक्षक रविकुमार यांनी मार्गदर्शन केले. पक्षाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी जो उमेदवार दिला जाईल, त्याच उमेदवाराला मतदान करण्याची सूचना यावेळी रविकुमार यांनी केली. यावेळी बैठकीला उपस्थित नगरसेवकांसोबत त्यांनी संवादही साधला.
महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेत लोकनियुक्त सभागृह स्थापन झाल्यापासून अपक्ष नगरसेवक शंकर पाटील व पूजा पाटील सत्ताधारी गटासोबत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नगरसेवक मंगळवारी बैठकीला उपस्थित होते. सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना अपात्र ठरविल्यापासून महापौर निवडणुकीत 'ऑपरेशन हस्त' राबविले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे यावेळी सत्ताधारी भाजपकडून विशेष खबरदारी घेतली आहे. यावेळी निवडणुकीच्या चार दिवस आधीच पक्षाचे निरीक्षक बेळगावात दाखल झाले आहेत.
इच्छुकांकडून अर्जही आधीच दाखल करून घेतले आहेत. गेल्या आठवड्यात माजी आमदार अनिल बेनके यांनी उत्तर विभागातील भाजप नगरसेवकांची बैठक घेतली होती, त्या बैठकीला काही नगरसेवक गैरहजर होते. रविवारी आमदार अभय पाटील यांनी दक्षिण विभागातील नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीला मात्र सर्व नगरसेवक उपस्थित होते.
