बेळगाव—belgavkar—belgaum : उचगाव येथील देवस्थान श्री मळेकरणी देवी सार्वजनिक सप्ताह उत्सवावर गावामध्ये मतभेद निर्माण होऊन प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेऊन सर्वांना सामावून घेऊन यात्रोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते व प्रतिवादी यांच्याकडून संयुक्त प्रतिज्ञापत्र (जॉईंट मेमो) न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
गेल्या 105 वर्षांपासून उचगाव ग्रामस्थांच्या वतीने मळेकरणी मंदिरामध्ये होळी पौर्णिमेला सार्वजनिक सप्ताह उत्सव मोठ्याने साजरा केला जातो. गुरुवारपासून (ता. 13) या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रम होतात. दररोज विविध कार्यक्रम साजरे केले जातात. त्यानिमित्त मळेकरणी देवी परिसरात यात्रोत्सवाची तयारी केली जात होती.
मळेकरणी सप्ताह गावकऱ्यांतर्फे होळी सणादरम्यान साजरा करण्यात येतो. दरवर्षी या सप्ताहात मांसाहारी जेवण असते. परंतु यावर्षी गावकऱ्यांनी शाकाहारी जेवण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची तयारी करण्यात येत होती. देसाई भाऊबंद कमिटीने न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे सप्ताहावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. कार्यक्रमाची तयारी सुरु असताना मानकऱ्यांकडून माळेकरणी देवी देवस्थानचे प्रवेशद्वार बंद केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे गावामध्ये मतभेद निर्माण झाले होते. या उत्सवावर मनाई आणण्याचा प्रयत्न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे उत्सवाबाबत साशंकता निर्माण झाली होती.
ग्रामस्थ व मानकरी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी न्यायालयाने नागरिकांच्या भावनेचा व श्रद्धेचा मुद्दा उचलून धरत दोन्ही पक्षकारांना आपसात वाद मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर याचिकाकर्ते व प्रतिवादी यांच्याकडून जॉईंट मेमो न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पक्षकारांना उत्सवामध्ये सहभाग घेऊन उत्सव साजरा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
देसाई बंधू कमिटीने उत्सव होऊ नये म्हणून आक्षेप घेतला होता. मात्र न्यायालयाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सप्ताहासाठी परवानगी दिली आहे. हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून, संपूर्ण गावाची एकात्मता आणि संस्कृती जपणारा सोहळा आहे. उत्सवावरून सुरु असलेला वाद परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. वादींतर्फे अॅड. जे. एच. गोविनकोप्प व प्रतिवादींतर्फे अॅड. श्रीकांत जी. कांबळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
