कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि. मिलाद इराण या मल्लांची आकर्षक लढत 27 मिनिटांच्या खडाजंगीनंतर बरोबरीतबेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित आनंदवाडी आखाड्यात बुधवारी 90 हून अधिक कुस्त्यांची मेजवानी मिळाली. या मैदानात कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर भारत, इराण व अमेरिका येथील मल्ल सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकाच्या लढतीत विशाल हरियाणाने महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला दुसर्या मिनिटाला ढाक डावावर अस्मान दाखवत बेळगाव मल्ल सम्राटचा बहुमान पटकावला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
प्रकाश बनकर, शिवा महाराष्ट्र, दादा शेळके यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत कुस्तीशौकिनांची मने जिंकली. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत विशालने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला. दुसर्याच मिनिटाला त्याने सिकंदरला चितपट करत कुस्ती शौकिनांची मने जिंकली. पंच म्हणून सुधीर बिर्जे यांनी कामकाज पाहिले.
बेळगाव केसरी किताबासाठी झालेल्या कुस्तीत प्रकाश बनकर वि. सोहेल इराण यांच्यातील कुस्तीने कुस्तीप्रेमींना खिळवून ठेवले. दहाव्या मिनिटाला प्रकाशने घुटना लावला. त्यातून सोहेलने सुटका करुन घेतली. कुस्ती वेळेत निकाली न झाल्याने गुणावर खेळवण्यात आली. तिसर्या मिनिटाला प्रकाशने पहिला गुण घेतल्याने त्याला बेळगाव केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून जोतिबा हुंदरे यांनी कामकाज पाहिले.
बेळगाव रणवीर किताबासाठी शिवा महाराष्ट्र वि. प्रॅडीला अमेरिका यांच्यातील कुस्ती रंगतदार झाली. दुसर्या मिनिरात शिवा महाराष्ट्र याने विजय मिळवल्याचे पंचांनी घोषित करताना उपस्थितांनी जल्लोष केला. यावेळी कुस्ती निकाली न झाल्याने पुन्हा खेळविण्यात आली. शिवा महाराष्ट्र याने प्रॅडीला याला एकेरी कस डावावर चितपट केले.
बेळगाव शौर्य किताबासाठी हादी इराण वि. दादा शेळके यांच्यातील कुस्ती युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते लावण्यात आली. दादा शेळके याने तिसर्याच मिनिटाला उलटी डावावर हादी इराणला अस्मान दाखवले.
डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि. मिलाद इराण यांच्यातील कुस्ती आर. एम. चौगुले व गणपत पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. पण पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सुटल्याचे जाहीर केले.
प्रकाश इंगळगी वि. विजय बिचुकले यांची कुस्ती बरोबरीत सुटली. शिवानंद दड्डीने सतपाल नागटिळकला एकचाक डावावर, प्रेम जाधवने संकेत कोल्हापूरला, कामेश कंग्राळीने संजू इंगळगी याला चितपट केले. याशिवाय ओमकार राशिवडे, अल्लाबक्ष, भूमिपुत्र मुतगा, जय राशिवडे यांनी विजय मिळवले. मैदानात लहान मोठ्या सुमारे 90 हून अधिक कुस्त्या झाल्या.
महिलांची कुस्ती डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत यांच्या हस्ते हिमाणी हरियाणा व स्वाती पाटील (कडोली) यांच्यात झाली. कडोलीच्या स्वाती पाटील हिने घिस्सा डावावर चित करीत मैदान मारले.
