बेळगाव—belgavkar—belgaum : परमेश्वरनगर येळ्ळूर येथे शनिवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने स्लॅबवरून उतरून दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश केला. कपाटामधील एक गंठण, एक अंगठी, एक चेन व कानातील टॉप्स असे अंदाजे 7 तोळे सोन्याचे दागिने व रोख 1200 रुपयांवर डल्ला मारून चोरटे पसार झाले. माहितीनुसार तुकाराम गल्लीतील इराप्पा बाबू राऊत हे चांगळेश्वरी हायस्कूलच्या प्राथमिक विभागात मुख्याध्यापक आहेत. ते पत्नी व वृद्ध वडिलांसह तुकाराम गल्लीत राहातात.
शनिवारी दुपारी ते साडेबाराच्या सुमारास आपल्या पत्नीसह बेळगावला दवाखाण्याला गेले होते. वडील वयस्क असल्याने ते खालच्या मजल्यावर झोपून होते. पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला. चोरीचा संशय येऊ नये म्हणून मागील बाजूने स्लॅबवर उतरुन त्यांनी घरात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे इराप्पा राऊत यांनी चप्पल स्टॅडमधील बुटामध्ये चावी ठेवली होती. चोरट्यांनी ती घेऊन स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. चावीने त्यांनी कपाट उघडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने, रोख ₹ घेऊन चोरटे पसार झाले. रात्री साडे नऊच्या सुमारास राऊत हे घरी आल्यानंतर ही घटना उघडकीला आली.
राऊत यांनी चोरीच्या घटनेची माहीती पोलिसांना दिल्यानंतर रात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. समोरच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर चुकवत चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसते. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांनी 2.46 वाजता प्रवेश केल्याचे दिसते. यामध्ये चोरट्यांची छबी कैद झाली असून तिघांच्या प्रतिमा दिसत आहेत, पण त्या अस्पष्ट असल्याने चेहरे ओळखता आले नाहीत.