CM Kejriwal cannot direct Atishi to hoist national flag on Aug 15 : GAD : दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरून राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये असल्याने दिल्ली सरकारच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केजरीवालांनी मंत्री अतिशी यांचे सुचवलेले नाव प्रशासनाने नाकारले आहे. दिल्ली सरकारमधील सामान्य प्रशासन मंत्री गोपाल राय यांनी आतिशी या ध्वजारोहण करतील, असे पत्र विभागाला दिले होते. त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश राय यांच्याकडून देण्यात आले होते.
पण काही तासांतच प्रशासनाने राय यांचे हे आदेश धुडकावून लावले आहेत. त्यामुळे आतिशी या ध्वजारोहण करू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल जेलमध्ये आहेत. त्यामुळे ध्वजारोहणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राय यांनी सोमवारी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, केजरीवाल यांनी अतिशी या ध्वजारोहण करतील, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे तचे नियोजन करावे.
सामान्य प्रशासन विभागाचे नवीन कुमार चौधरी यांनी राय यांनी दिलेल्या उत्तरात आतिशी ध्वजारोहण करू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. नियमांचा आधार घेत विभागाने राय यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून निर्णयाची प्रतिक्षा असल्याचे उत्तर विभागाने दिले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवरून आपच्या नेत्यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले, स्वातंत्र्यदिनावरून गलिच्छ राजकारण सुरू आहे.
जेलमध्ये असलेला गुन्हेगार सुकेश जेव्हा पत्र लिहितो तेव्हा तिहार प्रशासन लगेच नायब राज्यपालांना ते पत्र देतात, त्यावर ते लगेच आवश्यक कार्यवाहीही करतात. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्र लिहितात तेव्हा नायब राज्यपाल तिहार प्रशासनाला पत्र पाठवू नका असे सांगतात. त्यांना स्वातंत्र्यदिनाशी, देशाशी काही देणेघेणे नाही, अशी टीका सिसोदिया यांनी केली.