बेळगाव—belgavkar—belgaum : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे कागवाडचे आमदार राजू कागे यांची जीभ पुन्हा घसरली. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत सार्वजनिक सभेत अश्लील भाषा वापरून आ. कागे यांनी पुन्हा आपली वैचारिक पातळी दाखवून दिली. शिरगुप्पी येथील काहींनी नुकताच भाजप प्रवेश केला. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.
यावेळी भाषणात श्रीमंत पाटील यांनी कागवाड मतदार संघाचा विकास रखडला आहे. आपल्या काळात 3 हजार कोटींची विकासकामे मतदार संघात आणली होती. यापैकी काही कामे शिल्लक होती. त्याच्या निविदा निघून कामे सुरू होणे बाकी असताना निवडणूक लागली. यामध्ये आपण निवडून न आल्याने कामे रेंगाळली. परंतु, ही कामे पुढे नेण्याची गरज असताना सध्या प्रत्येक कामात राजकारण होत आहे. खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजना देखील सुरू होण्याच्या मार्गावर असताना ती देखील बंद पाडली आहे. सर्वच कामे बंद पाडून फक्त भ्रष्टाचाराला खतपाणी दिले जात असल्याचा आरोप त्यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.
श्रीमंत पाटील जे काही बोलले ते विषयाला धरून व कागवाड मतदार संघात नेमके काय चालले आहे, याबाबतच बोलले. परंतु, याला प्रत्युत्तर देताना आ. कागे यांनी आपली हद्दच सोडली. माझ्या नादाला लागू नकोस, असे म्हणत त्यांनी अश्लील अन् शिवराळ भाषा वापरली (he would strip the BJP leader and parade him if Patil interfered in his affairs.). लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरताना आपली भाषा सभ्य अन् सुसंस्कृत हवी. परंतु, आमदार असल्याचे विसरून कागे यांची जीभ घसरली व ते काहीही बरळले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मतदार संघातील जनतेतून राजकीय नेते कोणत्या थराला जाऊन टीका करत आहेत व घसरलेल्या पातळीची जोरदार चर्चा सुरू आहे.