बेळगाव—belgavkar—belgaum : म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांच्यावर प्रशासनाकडून दडपशाही करण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी भाषिक मातृभाषेसाठी गेली 70 वर्षे लढा देत आहेत. म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके मातृभाषेसाठीच लढा देत आहेत. तरीसुद्धा त्यांच्यावर अन्यायकारक गुन्हे दाखल करुन आता हद्दपारीच्या प्रस्तावाची नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सिमाभाग) यांच्या वतीने (कोल्हापूर) चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे, तरी या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत सिमावासीयांचा निरोप पोहोचवा अशी विनंती केली.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन याबाबतची सर्व माहिती निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुंचडीकर, सुयोग कडेमनी आदी उपस्थित होते.
सीमालढ्यापासून कार्यकर्त्यांना अलिप्त करण्याचा कुटील डाव आहे. त्यामुळे, मराठी भाषिकांनी याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून प्रशासन शेळके यांच्यावर विविध गुन्हे दाखल करत आहे. दरम्यानच्या काळात त्यांना एकदा अटक केली असून दोनवेळा जामीन मिळाला आहे. मराठी भाषेसाठी लढणाऱ्या शेळकेंवर दडपशाही करण्यात येत असून त्यांना लढ्यापासून अलिप्त करण्याचा कुटील डाव आहे. त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत आहोत. सीमाभागातील मराठी भाषिकांनीही आपापल्या ठिकाणी या घटनेविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकशाहीचा गळाच घोटण्याच्या पोलिसांच्या या कृतीचा सीमाभागाबरोबरच महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. सीमालढ्यात सक्रिय असलेल्या शेळके यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नेहमीच आवाज उठविला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर माळमारुती, मार्केट, कॅम्प आदी पोलिस ठाण्यांमध्ये 8+ गुन्हे दाखल आहेत. आता माळमारुती पोलिसांनी शेळके यांना हद्दपारीच्या प्रस्तावाची नोटीस पाठविली असून बुधवारी (दि. 2 एप्रिल) पोलिस आयुक्तांसमोर हजर राहण्याची सूचना केली आहे. या नोटिशीमुळे सीमाभागामध्ये खळबळ उडाली आहे. शेळके यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही. केवळ आपल्या मातृभाषेसाठी कायद्याच्या चौकटीत राहून आवाज उठविला आहे. हे चुकीचे असेल तर घटनेने दिलेले अधिकार हे केवळ नावापुरते आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
