बेळगाव—belgavkar—belgaum : मोबाईल रिचार्ज करताना तांत्रिक अडचणीमुळे रिचार्ज झाला नाही. फेल असे दाखवल्याने संबंधिताने कस्टमर केअरशी संपर्क साधला. परंतु, ज्या क्रमांकाशी संपर्क साधला ते ऑनलाईन भामटे असल्याचे लक्षात आले नाही. त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बँक खात्यावरील ₹ 95000 रुपये गायब झाले. याप्रकरणी सीईएनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, राणी चन्नम्मानगर येथे राहणारे शिवानंद हिरेमठ (वय 45) यांनी त्यांचा मित्र संतोष याच्याकडून रिचार्जकरून घेतला. परंतु, तांत्रिक कारणास्तव रिचार्ज झाले नाही. यावेळी एका मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीला कस्टमर केअरमधून बोलत आहोत, तुमचा मोबाईल रिचार्ज करायचा असेल अथवा रिचार्जची रक्कम परत मिळवायची असेल तर आम्ही सांगतो तसे करत जा, असे सांगितले. यानंतर भामट्यांनी एक लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले. या लिंकवर क्लिक करताच फिर्यादीच्या बँक खात्यावरील 95 हजारांची रक्कम काढून घेण्यात आली.
याप्रकरणी त्यांनी सीईएन पोलिसांत फिर्याद दिलीअसून निरीक्षक बी. आर. गड्ढेकर तपास करत आहेत. तातडीने तक्रार दिल्यानंतर बँक खाते गोठवल्यास फसलेली रक्कम परत मिळते. सदर फिर्याददाराने तातडीने फिर्याद दिल्याने यापैकी बरीच रक्कम पोलिसांनी गोठवली असल्याचे समजते. सुमारे 78 हजाराची रक्कम गोठवली असल्याची माहिती मिळाली आहे.