बेळगाव रेल्वेस्थानकाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी हुबळी नैर्ऋत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी गुरुवारी (22 ऑक्टोबर) येथील स्थानकाला अचानक भेट दिली. या वेळी अन्य अधिकारीही उपस्थित होते. श्री. सिंग म्हणाले, की रेल्वेस्थानकाच्या विकासकामांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विकासकामे लवकर पूर्ण होतील, हे पाहावे. मिरज - लोंढा दुपदरीकरण योजनेंतर्गत 170 कोटी रुपये खर्चातून बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवेशद्वार व कोचिंग टर्मिनल उभारण्यात येईल. स्थानकाला हायटेक स्वरूप देण्याची योजना आहे.
मार्च 2022 मध्ये काम पूर्णत्वास येईल. कोरोनामुळे कामाला विलंब झाला आहे. सध्या कामाला गती दिली जाणार आहे. दुसऱ्या प्रवेशद्वाराचे काम प्रगतीपथावर असून ते ही लवकरच पूर्ण होईल. रेल्वेस्थानक हायटेक बनविणे व त्याला वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या किल्ल्याप्रमाणे ऐतिहासिक बनविण्याची योजना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी आखली होती. त्यानुसार या स्थानकाचा विकास होत आहे.