बेळगाव : पंत बाळेकुंद्री येथे सालाबादप्रमाणे अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांची पुण्यतिथी / पंत पुण्यतिथी 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या विनंतीनुसार साध्या व सांकेतिक स्वरुपात पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीपंत महाराज यांचा श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे होणारा 115 वा पुण्यतिथी उत्सव यंदा कोरोनामुळे रद्द केला आहे. श्री दत्त संस्थानच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत सांकेतिक स्वरुपात व एका दिवसात उत्सव पार पाडण्याची परवानगी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच पंत बाळेकुंद्री परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या उत्सवासाठी दरवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व मध्यप्रदेश या राज्यातून लाखो पंतभक्त येत असतात. कोरोनामुळे ह्यावर्षी मोजक्या सेवेकर्यांच्या उपस्थितीत आमराई परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी उत्सव साजरा करत नसल्यामुळे उत्सवासाठी कोणीही श्रीक्षेत्री येऊ नये. उत्सव आपल्या घरी नियोजित तारखेदिवशी श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यातर्फे करण्यात आले आहे. कोरोना व प्रशासनाच्या अटीमुळे हा उत्सव होणार नाही. त्यामुळे पंतभक्तांनी श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे येऊ नये व त्यांनी 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत आपापल्या घरी पुण्यतिथी उत्सव साधेपणाने व श्रद्धेने करावा, असे आवाहन श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री यांनी केले आहे.