विजापूर : भाजपचा आमदार असून आपल्याला 100 कोटींचे अनुदान दिले नव्हते. पण, जमीर अहमद खानना 200 कोटींचे अनुदान मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले. हिंदूंचा नाश करण्याची भाषा बोलणाऱ्यांबाबत इतके प्रेम का ? असा प्रश्न मंत्रिपदापासून वंचित झालेले विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यांनी उपस्थित केला. येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, विकासकामांबाबत बोलल्यानंतर आपले संरक्षण सरकारने काढून घेतले आहे. याबाबत विचारल्यानंतर पैसे नसल्याचे कारण दिले जात आहे. जमीर अहमद खान यांच्यासह आणखी चार काँग्रेस आमदारांना निधी मंजूर करताना प्राधान्य देण्यात आले आहे. याविरुद्ध विधिमंडळ अधिवेशन प्रश्न उपस्थित केला जाईल. हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केले आहे.